शनिवार, ५ जानेवारी, २०१३

जगी हा खास वेड्यांचा पसारा..


        परवाच लोकलने कामावर जात होतो. काही कारणांमुळे गाड्या उशिराने धावत(?) होत्या. (मुंबईत राहणार्‍यांना याची सवय असतेच म्हणा.) गाडीतल्या सर्वांनाच कामावर जायला उशीर होणार असल्यामुळे कार्यालयातल्या परिस्थितीचा अंदाज बांधत सगळेच जण रेल्वेवर शिव्यांची लाखोली वाहत होते. (त्यात मीपण होतोच.) तेव्हा गर्दीत उभ्या उभ्या मनात विचार आला, जसं मुंबईला आणि मुंबईकरांना वेळ या वस्तूत फार रस आहे, तसाच भारतातल्या प्रत्येक मोठ्या शहराला एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल आहेच की.
        मग मी पाहिलेल्या शहरांबद्दल विचारचक्र सुरु झालं. पहिल्यांदा अर्थातच आठवली आमची मुंबई. पुलंनी म्हटल्याप्रमाणे, मुंबईला वेळेचं महत्त्व फार. सकाळी ५.५५ चा अलार्मपासून ७.३२ ची ट्रेन, ८.१५ ची ८४८ नंबरची बस अशा नुसत्या घड्याळाच्या काट्यावर मुंबईकर नाचत असतात. २६.११ होवो किंवा अजून काही, या शहराला थांबणं मंजूरच नाही. (अपवाद- बाळासाहेबांची अंत्ययात्रा. तेव्हा मात्र मुंबईकर स्वतःहून थांबला होता.)
        त्यानंतर येतं पुणे. पुणेकरांना सर्वात जास्त वेड कशाचं असलं तर तो म्हणजे त्यांचा बाणा. पुण्यात राहून जर तुमच्याकडे खास पुणेरी Attitude नसला, तर तुम्हाला तिकडे राहण्यास मनाई आहे. पुन्हा पुलंनी म्हटल्याप्रमाणे, "पुण्यात राहताना तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीचा जाज्ज्वल्य अभिमान असायला हवा. तो कशाचाही असेल, पण तो जाज्ज्वल्य हवा." नुकतंच काही कारणामुळे ३ महिने पुण्यात रहायचा योग आला. तेव्हा तर प्रत्येक क्षणी ही गोष्ट पटली. अहो, संध्याकाळी ६.३० वाजता डेक्कन जवळच्या प्रचंड रहदारीत माझ्या गाडीसमोर तू तुझी गाडी घातलीसच कशी, म्हणून भर रस्त्यात आपापल्या गाड्या पार्क करून एक्मेकांशी तावातावाने भांडणारे पक्के पुणेकर पाहिलेत मी. तेव्हा पुणेकरांचं वेड पुणेरी बाण्यात असतं एवढं मात्र नक्की.
        मुंबई आणि पुण्यानंतर येणारं मराठी शहर म्हणजे नागपूर. नागपूर, आणि सगळ्याच विदर्भाला "स्व" बद्दल अतिव प्रेम. मी, माझं यातच त्यांना रस असतो. आमचं नागपूर, आमच्या नागपूरची संत्री, आमच्या विदर्भातलं ताडोबा, आमची विदर्भी थंडी, आमचा नागपूरी वडाभात, आमचा वर्‍हाडी ठेचा... नागपूरकरांची ही आमचं ची यादी न संपणारी आहे.
        हे तर झालं आपल्या महाराष्ट्राबद्दल. गेले एक वर्ष कामानिमित्ताने इंदौर ला होतो. त्या शहराचं आणि इंदौरकरांचं प्रेमाचं ठिकाण म्हणजे खाणं. अस्सल इंदौरी माणूस पट्टीचा खवय्या आहे. सकाळी सकाळी मिळणा-या खास इंदौरी पोह्यांपासून दाल बाटी, गजक, रबडी, अशा सगळ्या पदार्थांमुळेच इंदौर खवय्या शहर म्हणून प्रसिद्ध आहे. इंदौरमधील खवय्यांचं पंढरपूर म्हणजे सराफा चौराहा. या भागात सराफांची मोठमोठी दुकानं आहेत. संध्याकाळी ही दुकानं बंद झाली, की दुकानांसमोरील कट्ट्यांवर पदार्थांचे ठेले लागतात, आणि खवय्यांची पावलं आपसूकच तिकडे वळतात. सराफा ला मिळणारे सगळेच पदार्थ बेफाट. मग तो आलू बोंडा (बटाटा वडा) असो, रुमाली रोटी आणि पनीर माखनवाला असो, प्रसिद्ध दहिवडा असो (हा देताना तो ठेलेवाला एका द्रोणात दही घेतो, आणि वडा एकदम स्टाईलमध्ये १०-१२ फूट हवेत उडवतो आणि थेट दह्याच्या द्रोणात पकडून आपल्या हातात देतो.), केसर रबडी असो, खास इंदौरी मटका कुल्फी असो, चिकन रेशमी कबाब असो, सगळंच जाम भारी.
काही वर्षांपूर्वी भटकायला राजस्थानला गेलो होतो. तिकडे अजून वेगळंच. राजस्थानी माणसाचं प्रेम आहे ते त्यांच्या ऐतिहासिक ठेव्यांवर. राजस्थानात राजेशाही घराणी असल्यामुळे जवळपास प्रत्येक शहरात जुने मोठमोठाले राजवाडे आहेत. आणि नव्या पिढीनेसुद्धा अतिशय काळजीपूर्वक त्यांना जपलंय. (महाराष्ट्रातले गड किल्ले आणि त्यांची अवस्था आठवतेय ना? खरं तर आपले गड नीट जतन केले तर राजस्थानी राजवाड्यांच्या तोंडात मारतील असले भव्य दिव्य आहेत. पण सरकारी अनास्था, आणि आपला निष्काळजीपणा.) आता बर्‍याचशा राजवाड्यांचे ३ भाग करून एक भाग त्या घराण्याला रहायला, एका भागात पंचतारांकित हॉटेल, आणि तिसर्‍या भागात म्युझियम अशी त्यांनी वाटणी केली आहे.
        भारताचं नंदनवन असणार्‍या काश्मीर आणि काश्मिरी माणूस यांची कथा अजून वेगळी. काश्मिरी माणसाला काश्मिरच्या निसर्गाचं, दाल सरोवराचं, हजरतबल दर्ग्याचं, शंकराचार्य मंदिराचं वेड आहे. पण काश्मिरचे मुख्यतः ३ भाग पडलेत, एक पर्यटकांचं काश्मिर, एक दहशतवादाने होरपळणारं काश्मिर, आणि एक लेह लदाख. श्रीनगर, जम्मू, पहलगाम, सोनमर्ग, गुलमर्ग या भागातल्या लोकांचं विशेष प्रेम तिकडे जाणार्‍या पर्यटकांवर, कारण पर्यटनातूनच त्यांचं घर चालतं. अनंतनाग, पुंछ, कुपवाडा या दहशतवाद्यांच्या भागातल्या जनतेला स्वतःचा जीवच इतका प्यारा आहे, की त्यांच्यासाठी तेच प्रेमाचं ठिकाण आहे. (बरोबरच आहे हो, जान है तो जहान है.) लदाखला जायचा योग अजून यायचाय.
        भारताची राजधानी दिल्ली. त्यांचं भलतंच. दिल्लीकरांना उगाचची नाटकं करण्यात रस आहे. (कॉलेजियन भाषेत आपण त्याला "फलवेगिरी" म्हणतो.) राजधानीच्या शहरात राहतात म्हणजे आपल्या डोक्यावर शिंगं आहेत, आणि फ**गिरी करणं हा आपल्याला सरकारने दिलेला हक्क आहे असं बहुधा यांना वाटत असावं.
        ही यादी उत्तरेकडच्या राज्यांची. दक्षिणेच्या राज्यांचं बोलायचं तर त्यांचं सर्वात जास्त वेड आहे ते धर्मात. मी कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ या चारही राज्यात हिंडलोय. कुठेही गेलं तरी कुठल्या ना कुठल्या धार्मिक स्थळाचं दर्शन हमखास होतंच. हैदराबाद, सिकंदराबाद आणि कोस्टल कर्नाटक भागात बर्‍याच मशिदी आहेत, तामिळनाडूमध्ये गोपुरम आणि मंदिरं भरपूर, तर केरळात विपुल संख्येने चर्चेस. (बाकी धर्मस्थळंसुद्धा आहेत, पण त्या त्या भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात ती ती स्थळं जरा जास्त आहेत.)
        दक्षिणेतलं हेवन म्हटल्या जाणार्‍या गोव्याबद्दल तर काही सांगायलाच नको. त्यांचं सगळं प्रेम काचेच्या बाटलीत भरलेल्या रंगीत पाण्यावर आहे. वास्कोच्या एका जेमतेम ७०-८० मीटर लांबीच्या बोळात रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे मिळून असणारे १४-१५ बार पाहिल्यावर तर मला याची अगदी खात्री पटली होती.
असो, आपापली वैशिष्ट्ये आणि खासियत घेऊन सगळेजण राहतायत. "जगी हा खास वेड्यांचा पसारा, मांडला सारा" हे खरंच आहे. प्रत्येकाची अदा निराळी, ढंग निराळे, तरीही आपण सगळे गुण्यागोविंदाने एकत्र नांदतोय. हे मात्र फक्त भारतातच होऊ शकतं.

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०११

माझी गोवा यात्रा...

एकदा फ़िरायला जाऊन आलं की लगेच परत कुठेही जायचं नाही हा माझा शिरस्ता या खेपेस मात्र मोडला. कोकणात जाऊन आल्यावर लगेचच गोव्याला जायचा योग आला. निमित्त ठरलं ते गोव्यात असणा-या BITS मध्ये असणारा QUARK हा त्यांचा Tech Fest.
गोव्याला जायचं नक्की ठरल्यापासूनच मनात अनेक विचार आणि plans बनायला सुरूवात झालीच होती. त्याबरोबर tech fest ची कामं पण होतीच. ती कामं आणि सगळं आटपत आटपत अखेरीस आमचा चमू मडगावला पोहोचला. आमचा मुक्काम होता तो वास्को शहरात.
पोहोचल्या नंतरचे ३ दिवस पूर्णपणे BITS मध्ये घालवल्या नंतर गोवा दर्शनासाठी आमच्या हातात फ़क्त एकच दिवस होता. त्या एका दिवसात जास्तीत जास्त गोवा बघायचा होता आणि ते पण बाईक्सवर फ़िरून. त्याचं systematic planning आणि बाईक्सची व्यवस्था करण्यात आधीची सगळी संध्याकाळ गेली. नेटवरून maps बघून अखेरीस मार्ग ठरला तो वास्को-कोलवा-वारका-मडगाव-पणजी-दोना पौला-मिरामार-कलंगुट-वास्को असा.
दुस-या दिवशी बाईक्स मिळून निघून GPS वरून रस्ता शोधत कोलवा बीचला पोहोचायलाच आम्हाला जवळपास १०.३० वाजले. कोलवा हा गोव्यातला सर्वात मोठा आणि स्वच्छ बीच आहे. तिथे भरपूर timepass करुन पुढे वारका बीचला जाता जाता १२ वाजून गेले होते. मध्ये रस्ता चुकल्यामुळे थोडा वेळ गेला. पण कुठल्याही परिस्थितीत मडगावला २ च्या आधी पोहोचणं भाग होतं कारण २.३० च्या जनशताब्दी एक्सप्रेसने आमच्यातला एक जण परतीच्या प्रवासाला लागणार होता. त्यामुळे वारका ला फ़ार वेळ न घालवता आम्ही १ वाजता मडगाव गाठलं.
चिन्मयला गाडीत बसवल्यावर आम्ही थेट सुटलो आणि पुढचं destination गाठलं ते दोना पौला. हा पणजीतला अत्यंत नयनरम्य spot आहे. अतिशय स्वच्छ आणि नितळ पाणी, निरभ्र आकाश, उत्तम सूर्यप्रकाश आणि ultimate photogenic views मुळे तिथून पाय निघता निघेना. शेवटी एकदाचे तिथून निघालो कारण पुढचा spot कलंगुट गाठून नंतर पुन्हा वास्कोला पण पोचायचं ना.
कलंगुटला पोचेस्तोवर ५.३० वाजले होते. कलंगुट हा सर्वाधिक विदेशी पर्यटकांनी गजबजलेला बीच आहे. त्यामुळे water sports etc आणि इतर गोष्टी ओघाने आल्याच. काही विशिष्ट angle ने जर फ़ोटो काढला आणि नीट edit केला तर miami चा फ़ोटो म्हणून सहज खपवता येईल इतकी विदेशी पर्यटकांची वर्दळ तिथे असते.
कलंगुट वरून निघेपर्यंत ७.३० वाजले होते. त्यानंतर मात्र कुठेही न थांबता ५५ किलोमीटरचा प्रवास करून पुन्हा वास्कोला यायला ८.३० वाजले आणि आमची एकदिवसीय गोवा सहल संपन्न झाली. एका दिवसांत अंदाजे १७५ किलोमीटरचा प्रवास झाला.
GPS सोबत असल्यामुळे लहान लहान बायपास वरून प्रवास झाला. त्यामुळे खरा निसर्गरम्य गोवा बघायचा योग आला आणि हा प्रवास आणखीनच सुखद झाला. या प्रवासाच्या काही आठवणी टाकत आहे. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे..




वास्को स्टेशन...

वास्को स्टेशनवरून दिसणारा सूर्यास्त...

वास्कोतला बैना बीच...

कोलवा बीच...



पोर्तुगीज पद्धतीचं घर....



दोना पौलावरून दिसणारा नयनरम्य देखावा...

दोना पौला...

आमचा सगळा चमू दोना पौला जवळ...

पणजी मधून पास होताना...

कलंगुट ला जाताना...

कलंगुट बीच...


परतीच्या वास्को मडगाव रेल्वे प्रवासात दिसलेला संकपाळ बीच...

बुधवार, २६ जानेवारी, २०११

माझी कोकण यात्रा











नुकताच मित्रांसोबत बाईकवरून कोकणात जायचा योग आला. श्रीवर्धन, दिवे आगार आणि हरिहरेश्वर असा २ दिवसांचा कार्यक्रम ठरला.
गेल्या गुरूवारी भल्या पहाटे ५.३० वाजता डोंबिवलीहून निघालो. बोच-या थंडीत बाईक चालवणं फ़ार जिकिरीचं होत होतं. साधारण सकाळी ६.१५ ला पनवेल फ़ाट्यावरच्या श्री दत्त मध्ये चहासाठी पहिला ब्रेक झाला. ६.४५ ते ८.३० riding करून पुढे NH १७ वर अलिबाग च्या थोडं पुढे काशिद बिचला पोहोचलो. हा होता आमचा दुसरा थांबा. काशिदला निवांत चहा, नाष्टा, recliners वर आराम आणि थोडीफ़ार photography करून आमचा काफ़िला पुढे मार्गस्थ झाला.
त्या नंतर मजल दरमजल करत, थोड्या लांबच्या पण किना-याला समांतर अशा नागाव, काशिद, मुरूड, राजपुरी, दिघी आणि शेवटी श्रीवर्धन अशा कोकणातल्या आतल्या लहान लहान गावांमधून जाणा-या निसर्गरम्य रस्त्यांवरून अखेरीस आम्ही दुपारी १२ च्या सुमारास श्रीवर्धनला पोहोचलो. आमचा मित्र तेजसच्या घरी सामानसुमान टाकलं आणि परत हुंदडायला मोकळे.
भर दुपारी २.३० च्या तळपत्या उन्हात गाड्या निघाल्या आणि पहिला थांबा ठरला तो श्रीवर्धन गावाजवळचा जिवना बंदर. मनसोक्त photography करून त्यानंतर आम्ही विसावलो ते श्रीवर्धनच्या विस्तीर्ण किना-यावर. पाण्यात यथेच्छ डुंबून, photography चे सगळे शौक पूरे करून संध्याकाळी दिवेलागणीला परत आमच्या तात्पुरत्या घरट्याकडे परतलो.
दुस-या दिवशीचा plan होता तो सकाळी लवकर निघून दिवेआगार, हरिहरेश्वर करायचं, तिकडून थेट म्हसळा फ़ाटामार्गे माणगाव वरून NH17 वरून परत डोंबिवली. पण तेजसच्या घरामागे असणा-या वाडीतून पाय निघेल तर ना? नारळ आणि सुपारीच्या त्या बागेतून निघून दिवेआगार कडे निघालो तर मध्ये माझ्या गाडीने थोडा त्रास दिला. त्यात बराच वेळ गेला आणि आम्हाला दिवेआगारात पोहोचायलाच वाजले दुपारचे १.३०.
त्यानंतरही photography ची हौस काही थांबेना. कोकण आहेच इतका photogenic. मध्ये मध्ये थांबून photo काढून हरिहरेश्वरला आम्ही धडकलो ३ वाजता. हरिहरेश्वराचं दर्शन, डोंगराला पदभ्रमण, आणखी photography, जेवण करून अखेरीस परतीचा प्रवास सुरू झाला संध्याकाळी ४.३० वाजता.
वाटेत म्हसळा फ़ाट्याच्या अलिकडे आमचा एक गाडीस्वार मातीवरून घसरून पडल्यामुळे थोडा वेळ थांबावं लागलं. त्यानंतर मात्र सगळे सुसाट सुटले आणि माणगावला बरोब्बर ५.४५ ला टेकले. चहा ब्रेक नंतर तर सर्वांना NH17 खुणावत होताच. सगळे आपापल्या bikes च्या top speed ने भरधाव निघाले आणि ठिक १.५ तासांनी पनवेलला आणि रात्री ९ ला डोंबिवलीला पोहोचले.
त्या २ दिवसांत एकूण ५०० किलोमिटर चा प्रवास झाला. पण हा सगळा प्रवास निसर्गरम्य कोकणातला असल्यामुळे कोणालाही कसलाही शिणवटा जाणवला नाही.
या सफ़रीतले काही photos सोबत टाकत आहे. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहेच.

मंगळवार, ११ जानेवारी, २०११

आय आय टी टेकफ़ेस्ट २०११ 2




आय आय टी टेकफ़ेस्ट २०११






सर्व इंजिनियरींग च्या विद्यार्थ्यांचा dream technical festival आय आय टी टेकफ़ेस्ट गेल्या आठवड्यात पवई आय आय टी मध्ये झाला. दरवर्षी काहीतरी नवीन आणि innovative दाखवण्याची परंपरा टेकफ़ेस्ट ने यंदाही पाळली.
या वर्षीचं मुख्य आकर्षण ठरले स्पोर्टस कार lotus ellise, university of California ने बनवलेला PR2 रोबोट, bmx stunt bikers आणि robowars. या शिवाय थायलंड आणि कोरियाहून आलेल्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं की रोबोटिक्स मध्ये त्यांचा हात धरणारे कोणीच नाहीत.
एक अंदाजानुसार या वर्षी किमान १ लाख मुलांनी टेकफ़ेस्ट ला भेट दिली. शिवाय त्यात participate केलेले वेगळे.
या टेकफ़ेस्ट च्या काही आठवणींचे फ़ोटोज टाकत आहे.

मंगळवार, ४ जानेवारी, २०११

आमच्या कुटुंबातील नवीन सदस्य...






बरीच वर्षे आमच्या घरात आम्ही तीनच जण होतो. हा शिरस्ता मोडला दिवाळीच्या थोडंसं आधी जेव्हा आमच्या घरात आलं एक छोटंसं माऊचं पिल्लु.
गेले काही महिने या मांजराने घरातल्या सर्वांनाच खूप लळा लावलाय. शुभ्र पांढ-या रंगाच्या आणि कपाळावर काळी जन्मखूण असणा-या माऊने सर्वांनाच आपलंसं केलंय.
तिचे काही फ़ॊटो टाकत आहे...

नविन वर्षात नवे काही...

दरवर्षी ३१ डिसेंबर येते आणि त्या पाठोपाठ येते १ जानेवारी आणि नवीन वर्ष.... दरखेपेस आपण काही नवीन संकल्प करतो आणि लवकरच ते संकल्प उदबत्तीचा धूर हवेत विरावा तसे विरूनही जातात. या वर्षी मी संकल्प केलाय थोडं लिहिण्याचा. बघूया किती जमतंय ते.

सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या प्रतिसाद आणि उत्तरांचे मन:पूर्वक स्वागत आहे.

प्रथम फ़डणीस.